नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ साली जेव्हा या देशाची सूत्रे स्वीकारली तेव्हा कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल)च्या एका बॅरलची किंमत १०६. ८५ अमेरिकन डॉलर होती तेव्हा पेट्रोलचे नक्त मूल्य किंवा मूळ किंमत (बेस प्राईस) हे ४७.१२ रूपये होते आणि ग्राहकांसाठी पेट्रोलचे सरासरी प्रति लिटर दर होते ७१.४१ रूपये. आज फेब्रुवारी २०२१ मध्ये कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ६३ अमेरिकन डॉलर असून मूळ किंमत २९.३४ रूपये असूनही आज पेट्रोल १०० पार झाला आहे. हेच का ते अच्छे दिन?
“बहोत हुई महंगाई की मार, अब की मार मोदी सरकार” ही घोषणा किती फसवी होती, मोदींनी सत्तेत येऊन जनतेचा किती विश्वासघात केला, याचा जळजळीत अनुभव आज प्रत्येक भारतीय घेत आहे.
मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोल ६० रूपयांपेक्षा महाग झाल्याने वेदना होऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते व कार्यकर्ते घोटभर पेट्रोल पिऊन बिळात किंवा शाखांमध्ये जाऊन लपले आहेत. या घटनेने भाजपला विविध ज्वलंत प्रश्नांवर वाटणारा कळवळा हा केवळ दिखावा असतो आणि त्यामागे केवळ राजकारण असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अन्यथा वीज बिले अधिक आले म्हणून राज्यात आंदोलने करणा-या भाजपने एकदा तरी पेट्रोल दरवाढीविरूद्ध किमान वक्तव्य तरी केले असते!
क्रूड ऑईलची किंमत व उपलब्धता, मूळ स्थानापासून ते रिफायनरीपर्यंतचा वाहतूक खर्च,रिफायनरीतील इंधन उत्पादन व प्रक्रिया खर्च, त्यानंतर तयार इंधनाचा पेट्रोल पंपांपर्यंतचा वाहतूक खर्च, पेट्रोल विक्रेत्यांचे कमीशन, केंद्र व राज्यांचे कर व सेस, इंधनांची मागणी व पुरवठ्याची स्थिती तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय रूपयाची किंमत या घटकांवर पेट्रोल-डिझेलची किंमत अवलंबून असते. याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणातील व अर्थकारणातील मोठ्या घडामोडी, कोरोनासारख्या महामारी, युद्ध वा अशांतता यांचा क्रूड आईलच्या किंमतीवर परिणाम होत असतो.
एक बॅरल म्हणजे १५९ लिटर! देशाच्या गरजेच्या ८० टक्के क्रूड ऑईल आपण आयात करतो. हा व्यवहार अमेरिकन डॉलर (युएसडी) या चलनात होत असल्याने भारताच्या रूपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली की क्रूड आईलसाठी आपल्याला जादा पैसे मोजावे लागतात. २६ मे २०१४ ला जेव्हा मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली तेव्हा एका युएसडीची किंमत ५८.६६ रूपये होती. रूपयाला डॉलरच्या बरोबर आणू म्हणणा-या मोदी सरकारच्या काळात सात वर्षात रूपया डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरला. २६ मे २०२१ रोजी एका युएसडीची किंमत ७५.८२ रूपयांवर पोचली. मोदींच्या आर्थिक आघाडीवरील अपयशाचा याहून दुसरा पुरावा तो काय?
(प्रमोद चुंचूवार)