ठाणे : सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. एकिकडे देशात कोरोनाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे इंधनदारवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बेहाल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता वाढत्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. या संदर्भात राष्ट्र्वादीने पोस्टर झळकावले आहेत.
पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा खोचक मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यात लावली आहेत. राष्ट्रवादीच्या या हटके आणि खोचक होर्डिंगबाजीची ठाण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाच्या सत्ता काळात इंधन दरवाढीचा आलेख चढत राहिला आहे. मे महिन्यामध्ये सुमारे १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत.
आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे होर्डिंग्ज संपूर्ण ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यामुळे हे होर्डिंग्ज ठाणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरली आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक संपल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील ४ तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झालीय. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डिझेलच्या किंमतीत २९ पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा खोचक मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे.