मुंबई | पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला आहे. पण, या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी जोरदार टोला राष्ट्रवादीला लगावला होता आता त्या पाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र बापाचा माल असल्यासारखा महाविकास आघाडी सरकार वापरत आहेत. बालेवाडी स्टेडियम रनिंग ट्रॅकवर पवारांच्या व मंत्र्यांच्या गाड्या पार्क, पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे मग वाट लागली तरी चालेल पण पवार घुसणारच. दोन कोटीचा ट्रॅक ह्या विषयामुळे वाया गेला, राष्ट्रवादी पक्षाचे नुकसानाचे पैसे द्यावे असे निलेश राणे यांनी म्हंटल.
तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ‘पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठात ५ कोटींच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकची ऐशीतैशी करत थेट शरद पवार, क्रीडामंत्री सुनिल केदारे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्याच उभ्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण आहे,’ अशी टीका भातखळकरांनी केली आहे.