मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षाचं तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच आगामी निवडणूका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढण्याचे संकेत दिले आहे. मात्र आता या आघाडीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे.
पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, असे भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. हे महाविकास आघाडी सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.