हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल आपल्या 15 हजार कार्यकर्त्यांसह आज दुपारी 12 वाजता भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करत एक पोस्टर जारी केलं आहे.
या पोस्टरनुसार हार्दिक पटेल गुरुवारी, 2 जून रोजी पटेल कमलम गांधीनगरमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं. पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, हार्दिकचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजता ते घरी दुर्गा पठण करतील, त्यानंतर ते सकाळी 10 वाजता SGVP गुरुकुल येथे श्याम आणि धनश्याम यांची आरती करतील.
हार्दिक पटेल यांच्या जारी करण्यात आलेल्या पोस्टरनुसार, भाजप प्रवेशापूर्वी ते साधु-संतांसह गोपूजेत सहभागी होतील. त्यानंतर ते 11 वाजता कमलम् गांधीनगरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांच्या नाराजीनंतर हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहत पक्षाला रामराम केला होता अखेर ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत.