प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचे खरे मास्टरमाइंड माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच आहेत व त्यांना वाचवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाची धडपड सुरू आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केला.

‘अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली जी गाडी उभी होती, त्या प्रकरणी सचिन वाझे यास अटक झाली. आता प्रदीप शर्मा यांनाही अटक झाली आहे. पण या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड वेगळाच आहे. त्याचा शोध घ्या अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. त्याला इतके दिवस का लागतात? ही काय पंचवार्षिक योजना आहे का?,’ असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणातील खरा सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, याचे मास्टरमाइंड परमबीर सिंग हेच आहेत. त्यांना वाचवण्यासाठीच भाजपची धडपड सुरू आहे. भाजपनेच माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिण्यास परमबीर सिंग यांना भाग पाडले, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. आता मुश्रीफ यांच्या या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.