भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले असून पीएफची रक्कम थकल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने वैद्यनाथ कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे ह्या सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार पंकजा मुंडे यांनी कामगारांचे पीएफचे १ कोटी ४६ लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले असून तब्बल ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १ कोटी 46 लाख इतकी रक्कम थकीत होती. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.