पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भरत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यात राष्ट्र्वादीने भरत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, आता या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल होणं महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्मदेखील देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. एवढच नाही तर ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.