राज्यात आघाडीचे सत्ता स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. त्यात लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहे. सध्या राज्यात वाढवण्यात आलेल्या १६ मे पर्यंतच्या लॉकडाऊन वरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“मुख्यमंत्रीजी सांगा गरिबांनी जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा…5 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे,
पुढे ते म्हणतात की, “संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाही” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणावा तेवढा कठोरपणे पाळला जात नाही, असे अनेक जिल्ह्यात दिसत आहे. सकाळच्या वेळी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी काळजी निर्माण करत आहे. त्यामुळे आहे तो लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवा, शिवाय तो आणखी कठोरपणे अंमलात आणा, अशा सूचना एकमताने सर्व मंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या. पोलिसांनी थोडा संयम कमी करून मोकाट फिरणाऱ्यांना बंधने आणली पाहिजेत. जाब विचारला पाहिजे, अशा सूचनाही काही मंत्र्यांनी केल्या होत्या.