(मुंबई प्रतिनिधी) शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आशिष शेलार यांच्यात झालेल्या भेटीमुळे राज्यातील वातारण चांगलेच तापू लागले आहे. तसेच या भेटीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी भाष्य केले होते. शिवसेनेसोबत आमचं काही शत्रुत्व किंवा धुऱ्याचा वाद नाही. युतीबाबत जर-तरच्या गोष्टी मी करणार नाही योग्यवेळी परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं होतं. आता या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
राऊत म्हणाले की, ‘देवेंद्रजी म्हणाले ते योग्यच आहे. मतभेद आहेत, आमचे रस्ते वेगळे आहेत पण मैत्री कायम आहे. मात्र कुणीही याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा घेऊ नये कारण त्याचा अर्थ तसा होत नाही.’ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हेच सांगत होतो की आमच्यात मतभेद आहेत. आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. मात्र मैत्री कायम आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकार स्थापन करू. परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याबाबत मला माहित नाही, त्यांच्याकडे कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.