सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनची मुदत येत्या १ जून रोजी संपत होत आहे. मात्र पुन्हा एकदा काही दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात यावा जेणेकरून कोरोनाला रोखण्यात यश येईल अशी मागणी काही आघाडीच्या मंत्र्यांनी केली आहे. मात्र आता या निर्णयाला जोरदार विरोध होताना दिसत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, आता १ जूननंतर दुकानं उघडू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि दुकानं उघडू द्यावे, अशी मागणी केली आहे. तसंच, दुकानं उघडण्यास परवानगी नाही दिली तर आम्हीच दुकानं उघडू, असा इशाराही राज्य सरकारला दिला. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सचिव प्रतीक कर्पे, व्यापारी प्रतिनिधी विरेन शहा,विनेश मेहता, मोहन गुरनानी, यांच्या आदींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
तसेच महाराष्ट्रमध्ये २० लाखांपेक्षा जास्त दुकानदार, व्यापारी आहेत. त्यांच्यावर अवलंबून अनेक लोक आहेत. मात्र हे सर्व सध्या बंद आहे. यामुळे मोठं नुकसान होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढणार आहे, तेव्हा दुकाने सुरू करायला परवानगी द्यावी, GST आणि विजेचे बिल यामध्ये लॉकडाऊन काळासाठी सवलत द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच रिक्षा चालकांपासून सगळ्यांना सरकारने मदत केली आहे, आम्हाला सरकारने मदत केलेली नाहीये. जर 1 जूनपासून दुकाने सुरू करायला परवानगी दिली नाही तर दुकाने आम्ही उघडणार, असा इशाराही भाजपने दिला आहे.