मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना खासदार छत्रपती संभाजी राजेंनी येत्या १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्यातच भाजपने सुद्धा या आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच या मुद्द्याचे सुद्धा विरोधक राजकारण करून आघाडीच्या अडचणी वाढण्याचे काम करताना दिसत आहे, याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
आज फेसबुकद्वारे साधलेल्या संवादात मराठा आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच कशाप्रकारे समाजाला न्याय मिळवून देता येईल याबाबत त्यांनी भाष्य केले. “मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही, असे वातावरण विरोधक तयार करत आहेत. हे साफ खोटं आहे. मी अतिशय स्पष्ट बोलणारा माणूस आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. सर्वोच्च न्यायालायने यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयाला आवाहन करणे त्यातून लोकसभा आणि पंतप्रधानांची मदत घेणे आमचा प्रयत्न आहे.
कारण नसताना समाजाला भडकवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे माझी तमाम मराठा समाजातील जनतेला विनंती आहे कि त्यांनी वस्तुस्थिती काय आहे ती समजून घ्यावी. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत”, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. तसेच इतर समाजातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.