मुंबई : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. या वरून सर्व राजकीय पक्ष आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
पत्रका गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. यात लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचं या संघटना आणि पक्षांचं म्हणणं आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं याची माहिती मिळाली पाहिजे.
गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केलं आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे, असं नारायण राणे यांंनी म्हटलं आहे.