मुंबई : सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगले तापलेले असताना सुरु असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
मराठा आरक्षण संदर्भात अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा दाखल देत पुन्हा एकदा ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
मराठा आरक्षण सुनावणीतील युक्तीवादाचा दाखल देत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे,” असं म्हणत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
तसेच “राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.