आरोप करणाऱ्यांना करू द्या, माझ्यावर ईडीची कुठलीही कारवाई झालेली नाही आणि होणारही नाही. त्याचा मी जास्त विचारही करत नाही असे शविसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परिवहन मंत्री परब सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीबाबत केलेल्या आरोपांचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी मंत्री अनिल परब यांना टार्गेट केले आहे. यावर आता मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
आता ईडीने देशमुख यांच्या पत्नीला सुद्धा नोटीस बजावली आहे. दरम्यान, ईडीच्या तपासावरून भाजपा महाविकास आघाडीवर सतत टीका करते आहे. देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागणार असल्याचे भाजपायाचे नेते म्हणत आहेत. यावरच आता मंत्री अनिल परब यांनी सडेतोड उत्तर विरोधकांना दिले आहे.