छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना सदाशिवनगर बंगळुरु येथे घडली होती. यावरून महाराष्ट्रातही चांगलच राजकारण पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यातच आता रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
महादेव जानकर यांनी ‘शिवाजी महाराज ओबीसी होते,’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परभणी येथे ओबीसी आरक्षण कृती समितीतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बंगळुरू येथील घटना ताजी असतानाच जानकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारच्या मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. याशिवाय न्यायालयानं केलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.