भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. आता त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नेता नवीन जिंदल यांची प्राथमिक सदस्यता पक्षाने रद्द केली आहे. तसंच या दोघांविरोधात एफआयआरदेखील दाखल केला आहे. भारत सरकारच्या या कारवाईचे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने कौतुक केले आहे.
‘पैगंबर मोहम्मद यांचा सन्मान आमच्यासाठी सगळं काही आहे. आमचं जगणं मरणं आणि सगळं काही करणं फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. आमच्या प्रिय पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत अपमानजनक शब्दांचा वापर करणाऱ्यांची मी तीव्र शब्दांमध्ये निंदा करतो. हे लाजिरवाणं वक्तव्य करणाऱ्या लोकांचं निलंबन केल्याबद्दल मी भारत सरकारचं स्वागत करतो. अशा लोकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे पुन्हा असं कोणी करणार नाही, याची काळजी भारत सरकारने घ्यावी,’ असं शोएब अख्तरने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये नुपूर शर्माच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
