साकीनाका प्रकरणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी थेट महविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. तसेच काल पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री यांच्या सुरु असलेल्या लेटरवॉर वरून निशाणा साधला होता. मात्र आज भाजपाच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आल्यानंतर चित्रा वाघ यांनी काहीही भूमिका घेतलेली नाहीये याच मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, आता खोटे रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली, असा खरमरीत सवाल केला आहे. भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली, फोन बंद का, असे रोखठोक सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
आता स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे. पोलिस स्टेशनला जाणार आहे, असे सांगत केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम भाजपकडून होत आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणाऱ्या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्वीच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकले असते, अशी घणाघाती टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.