कणकवली | शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत.
नितेश राणे यांना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई केली आहे. न्यायालयाने घातलेल्या बंदीवरून शिवसेचे ना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांना कणकवलीत येण्यास बंदी घातल्याने काही काळ शांतता नांदेल, अशा खोचक शब्दात केसरकर यांनी टीका केली.
नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर केसरकर यांनी सावंतवाडी मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी केसरकर म्हणाले, नितेश राणे यांच्या छातीत दुखत आहे, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. या परिस्थिती त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, अशी मी प्रार्थना करतो. नितेश राणे यांच्या दुसऱ्या समर्थकांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
नितेश राणे यांची प्रकृती ठीक नसताना फटाके फोडून जल्लोष साजरा करणे योग्य नाही. आपला नेता आजारी असताना कार्यकर्त्यांनी फटाके फोडणे कितपत योग्य आहे. शिक्षा झालेले कैदी आपल्या छातीत दुखत असल्याचे म्हणायला लागले तर वेगळा सेक्शनच सरकारने तयार करावा. यापूर्वी नितेश राणेंना दोनवेळा शिक्षा झालेली आहे त्यामुळे ते आता तरी सुधरतील, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला.