मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे करणे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत केंद्रीय मंत्र्याने सुसंस्कृत भाषा वापरली पाहिजे असे विधान पवारांनी केले होते.
यावरून अरण्यात राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला होता. कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे असल्याचा टोला लगावला होता. दरम्यान पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे-तुरे’ असे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय लघु उद्योगमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना सुनावले. आपत्तीग्रस्तांना तुम्ही भेटायला गेला होता की अधिकाऱ्यांना, असा सवालही अजित पवार यांनी केला.
