जळगाव | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकारण रंगायला सुरूवात झाली असून पाच पैकी चार राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली तर शिवसेनेचा मात्र फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यातच शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते यावरून राज्यात टीकेचं राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच सत्ताधारी आणि व्रिरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केल्या आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. फडणवीस सर्वांना पुरून उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशी टीका नितेश राणेंनी केली होती.
नितेश राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे कोण आहेत?, असा प्रश्न विचारत गुलाबराव पाटलांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.