मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून त्यांनी लक्षद्वीप प्रशासनाच्या धोरणांकडे लक्ष देण्याचं आवाहन केले आहे. काही दिवसांपुर्वी लक्षद्वीपच्या नवनियुक्त प्रशासकांनी घेतलेल्या वादग्रस्त धोरणात्मक निर्णयावर त्या भागातील खासदार पी. पी. मोहमंद फैझल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या धोरणांना विरोध केला होता . हाच मुद्या उचलून शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार लक्षद्वीपमध्ये प्रशासनाने एक कायदा बनवला आहे. लक्षद्वीप संरक्षण कायदा असं त्याचं नाव आहे. या कायद्यातून गोवंश हत्येवर बंदी घातली जाणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका कायद्याद्वारे त्याठिकाणी दारूचा व्यवसाय वाढवण्याची योजना आहे. या कायद्याला लक्षद्वीपमध्ये जोरदार विरोध केला जात आहे. त्यावरून स्थानिक खासदार पी. पी. मोहमंद फैझल यांनी आक्रमक पवित्रा घेत नाराजी व्यक्त केली होती.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर मात्र लक्षद्वीपमध्ये दुसऱ्या लाटेत झपाट्यानं रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. यासाठी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना जबाबदार धरले जात आहे. पटेल यांच्या कारभारावर लक्षद्वीपचे लोक संतप्त आहेत, असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. नवीन प्रशासक त्यांच्या मनमानी पद्धतीनं कारभार करत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे लक्षद्वीपांच्या परंपरेलाही ठेस पोहोचत आहे, असं लक्षद्वीपचं खासदार मोहम्मद फैझल यांनी म्हटलं आहे.