मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे एनसीबी’च्या कोठडीत समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी, इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिब, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन, तसेच सर्वांना आपला अभिमान वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनावेळी दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह पथकाने आर्यनचे समुपदेशन केले. तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक केली आहे.
आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.