उस्मानाबाद-प्रा.सतीश मातने राजकीय कट्टा संपादक एखादी नगरपालिका राजकीय नेते चालवू शकतात हे इतके दिवस सामान्य जनतेला माहिती होते मात्र सहा महिन्यापासून नगरपालिका व जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनामार्फत चालवल्या जात आहेत. या काळात आपले कसे होणार?ही चिंता सामान्य नागरिकांसह अनेकांना होती मात्र अनेक नगरपालिका उत्तमरीत्या त्यांचा कारभार चालू आहे त्यापैकीच एक म्हणजे उस्मानाबाद नगरपालिका होय.

उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्या कामाचा धडाका पाहून ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. उस्मानाबाद नगरपालिकेत काल मला जाण्याचा योग आला यावेळी मला जे चित्र दिसले याचेच हे वर्णन आहे.

अधिकाऱ्यांचे कौतुक यासाठी करायचे की त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे व चुकीचं काम केलं तर शाब्दिक आसूड देखील ओडला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने पत्रकाराचे काम आहे म्हणूनच उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्या कार्यपद्धतीवरचाच हा लेख आहे.

उस्मानाबाद नगरपालिकेत काल बारा वाजता मी गेलो होतो तिथे गेल्यानंतर मुख्याधिकारी यांच्यासमोर जवळपास 20 ते 25 लोकांचा गराडा होता. माझे त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी एक खुर्ची घेतली आणि त्या ठिकाणी बसलो. मला जरा थोडं निवांत बोलायचं होतं म्हणून मी थोडी गर्दी कमी होण्याची वाट पाहत होतो मात्र लोक जसे काम करून निघून जात होते तसेच नवीन लोक येऊन नंतर बसत होते त्यामुळे पंचवीस लोकांची गर्दी कधीच कमी झालेली दिसली नाही. जवळपास दोन वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी बसलो मात्र लोकांची गर्दी कमी होत नाही हे पाहून नंतर मीच स्वतः हरीकल्याण यलगट्टे यांच्याकडे माझी ओळख करून दिली आणि माझं कामाचं स्वरूप सांगितले. ज्या प्रमाणे इतरांची ते काम करत होते त्याप्रमाणे माझंही काम त्यांनी केले.

या दोन तासाच्या दरम्यान मला जे दिसून आलं त्यामध्ये उस्मानाबाद शहरातील वयस्कर नागरिक असतील, सर्वसामान्य लोक असतील,अधिकारी असतील, गुत्तेदार या सर्वांच्या समस्येचे निराकरण त्यांच्याकडून तात्काळ होतं होत.अनेकांना ते लगेच करू असं सांगत होते तर काही जणांना काही दिवस थांबा आपण करून टाकू असं सांगत होते. मात्र नागरिकांच्या चेहऱ्यावर आपलं काम होणार असंच दिसत होतं. नगरपालिकेचे जुने कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठी व ईपीएफच्या रक्कमेसाठी त्यांच्याकडे आले होते. त्या सहकार्यांच्या रकमा जवळपास सात ते आठ लाख रुपये इतक्या होत्या. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील आपण या रकमा तीन ते चार टप्पे पाडू असेच संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ लगेच संबंधित अधिकारी यांना फोन करून यांचे चेक तयार करा असं सांगत होते.

अधिकाऱ्यांची खरी कसरत असते ती वेगवेगळ्या पक्षाचे गुत्तेदार सांभाळण्याची ते काम देखील मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे हे उत्तम रीतीने पार पडताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडे येणारे गुत्तेदार हे सर्वच पक्षाचे होते तर काही माजी सर्वपक्षीय नगरसेवक देखील आमच्या या भागात रस्ते तयार करा,गटारी तयार करा, स्वच्छतेसाठी माणसं पाठवा,अतिक्रमण झाले ते काढायला लावा अशा विविध समस्या घेऊन येत होते. प्रत्येकाच्या समस्येला ते उत्तर व संबंधित अधिकाऱ्याला फोन करून ते काय आहे ते पटकन बघून घेऊन मला संध्याकाळपर्यंत कळवा असं ‘ऑन दी स्पॉट’ निर्णय घेत होते.
तर त्यांचेच काही सहकारी मला साहेब उद्या रजा पाहिजे असे अर्जही घेऊन येत होते त्यावर उद्या रजा घ्यावीच लागेल काय? नाही घेतली तर चालणार नाही का?अशी विचारपूस करून तात्काळ त्यावरही निर्णय घेत होते.काहीजणांच्या गुंठेवारीचे प्रश्न होते तर काहीजणांच्या नगरपालिकेच्या नाव नोंदणी बाबतचे प्रश्न होते आज असे अनेक प्रश्न घेऊन येणारे नागरिक मी बारा ते दोन या काळात त्या ऑफिसमध्ये कार्यालयात पाहिले मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आपलं काम झाले आणि आपलं काम होईल असा चेहरा असणारे लोक देखील मी मानसशास्त्र चांगलं असल्यामुळे बघितले.

उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्याधिकारी हरी कल्याण येलगट्टे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि ते राजकारणी लोकांची उणीव भासू देत नाहीत हे जितके चांगल आहे तितकेच ते तुमच्यासाठी व्यक्तिगत वाईट आहे कारण हे राजकारणी त्यांच्याशिवाय काही होत असेल तर ते त्यांना चालत नाही सावधान रहा हा न मागता सल्ला देखील घेऊन आलो.