मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले होते. याच मुद्दयावरून मलिक आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर टीका केली होती. त्या पाठोपाठ फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर सकाळी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते.
नवाब मलिक यांनी केलेल्या या आऱोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी ‘Thought of the day’ या कॅप्शनसह एक ट्विट केलं आहे. काय म्हणाले होते नवाब मलिक? बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं. नागपुरातील मुन्ना यादव याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदावर बसवलं.
तसेच हैदर आझम हा बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. याच्या दुसऱ्या पत्नीवर बनावट कागदपत्रांच्या संदर्भात मुंबईतील मालाड पोलिसांत गुन्हा दाखल होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेला होता असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यावर आता भाजपा नेते मलिक यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे.