मुंबई | डॉन दाऊद इब्राहिमसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मलिक यांची तब्येत बिघडल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही त्यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचा ईपीआरही जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने यापूर्वीच त्यांना यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करन देण्यास परवानगी दिली होती. मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते चौकशीदरम्यान धमकावण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते प्रश्नांची उत्तर देण्यात टाळाटाळ करतात, अशी ईडी अधिकाऱ्यांची तक्रार असल्याचे समजते.
ईडी मलिक कुटुंबीयांना आणखी एक धक्का देण्याच्या विचारात शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीकडून मलिक यांचे पूत्र फराझ मलिक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराझही या व्यवहारात सहभाग होते. मलिक यांचे बंधू अस्लम मलिक आणि फराझ मलिक हे जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसीना पारकरच्या घरी गेले होते. हा जमिनीचा सौदा ५५ लाख रुपयांना झाला होता.