पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना दुसरीकडे घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ७९४ रूपये इतकी झाली आहे.या वाढत असलेल्या किमतीविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन केला जाणार आहे. राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन केले जाईल.
आज सकाळी ११ वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. राज्यात तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
तसेच कित्येकांना स्व:तच्या खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. फक्त फेब्रुवारीमध्ये तीन वेळा गॅसचे भाव वाढल्यामुळे गृहिणी त्रस्त आहेत. परिणामी नागरिकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. याच कारणामुळे राष्ट्रावादीने आज राज्यभरात चूल मांडा आंदोलनाचे आयोजन केले आहे. आज सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.