मुंबई : सध्याच्या परिस्थितीतील महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून केले आहे. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे .
संदीप देशपांडे यांनी कालदेखील मुंबईतील पत्रकारपरिषदेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचयव्हर टीका केल्यामुळे अनेकांच्या भुवल्या उंचावल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची फिरकी घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. तसेच राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले की, संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात असा टोला लगावला होता.