देशात कोरोनाने प्रभावित होणा-यांची रोजची संख्या ४ लाखांवर पोचली असताना आणि रोज हजारो माणसे मरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्ष सेंट्रल विस्टा या महत्वाकांक्षी पुनर्विकास बांधकाम प्रकल्पावर केंद्रित केले आहे. २० हजार कोटी खर्चून नवे संसद भवन, नवे पंतप्रधान निवास, उपराष्ट्रपतींसाठी नवे निवासस्थान, केंद्रीय सचिवालय बांधून ३ किमी लांब राजपथाचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.
या कामासाठी रोज दिल्ली बाहेरून २ हजार कामगार दिल्लीत येतात. हे कामगार किती लोकांना कोरोनाची बाधा करतील, याची कल्पनाच न केलेली बरी. जाणकारांनी या प्रकल्पाची तुलना मुसोलिनी आणि हिटलरच्या प्रकल्पांसबोत केली आहे. डेली मेल या जागतिक पातळीवरील नामवंत दैनिकात डेव्हिड जोन्स यांनी एक लेख लिहिला असून मोदी आपल्या आत्मकेंद्री, स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तिमत्वाची विखारी भूक भागविण्याचा प्रयत्न सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाव्दारे करीत आहेत, अशी टीका केली आहे.
‘नार्सिसिस्ट’ हा एका मानसिक आजाराशी सबंधित व्यक्तीमत्वातील दोष असून ही उपमा मोदींनी बहाल करण्यात आली आहे. या २० हजार कोटीत देशातील ८० टक्के लोकांचे लसीकरण करता आले असते किंवा सर्व सुविधायुक्त ४० रूग्णालये देशात बांधता आली असती असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ्जांचे मत आहे. जगातील २५ टक्के कोरोनामृत्यू भारतात होत असताना या प्रकल्पाला प्राधान्य देऊन मोदी सरकारने आपले प्राधान्यक्रम कसे चुकीचे आहेत आणि सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षाशी आपल्यालाही काहीही देणेघेणे कसे नाही, हे दाखवून दिले आहे.