नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्याची पालिकेकडून पाहणी
मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत कारखाने विभागाच्या संयुक्त पथकाने आज बंगल्याची दोन तास पाहणी केली. या पथकात सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्यासह नऊ अधिकारी, अभियंते आणि फोटोग्राफर यांचा समावेश होता. दरम्यान, पाहणीदरम्यान बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथे 2009 साली बांधलेल्या अधीश बंगल्यात महापालिकेची परवानगी न घेता काही अंतर्गत बदल करण्यात आले आहेत, अशी लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली होती.
त्यानुसार, आज मुंबई महापालिकेच्या 9 अधिकार्यांच्या संयुक्त पथकाकडून 11 वाजल्यापासून बंगल्याची पाहणी सुरू झाली. दोन तास ही पाहणी चालली. पाहणीदरम्यान, पथकाने काही फोटो घेतले तर बंगल्यातील काही ठिकाणची मोजणी केली, मापे घेतली. बंगल्याची मूळ कागदपत्रे आणि पथकाकडे असलेल्या कागदपत्रे यांची पडताळणी केली. याबाबत नारायण राणे यांनाही काही प्रश्न विचारण्यात आले.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी मुंबई महापालिकेचे संयुक्त पथक पाचनंतर बंगल्यात दाखल झाले होते. मात्र, संध्याकाळी सरकारी कारवाई करता येत नसल्यामुळे तसेच बंगल्याचे मालक नारायण राणे हे दिल्लीत असल्यामुळे पाहणी न करताच पथक माघारी परतले होते.