शाळा किंवा महाविद्यालयात धार्मिक-राजकीय वाद होऊ नयेत असे सांगतानाच शाळेने निश्चित केलेला गणवेश मात्र घातलाच पहिजे, अशी सडेतोड भूमिका पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मांडली.मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
कर्नाटकीतील उडुपी येथील एका शासकीय महाविद्यालयात मुस्लिम तरुणींना ‘हिजाब’ परिधान करून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले. महाविद्यालयाचे गणवेशाबाबत धोरण असून त्या आधारे हा मज्जाव करण्यात आल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र यावरून ‘हिजाब विरुद्ध भगवी शाल’ असा वाद सुरू झाला आहे.
कर्नाटकात या प्रकरणावरून जोरदार आंदोलन सुरू असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शाळा, कॉलेज, विद्यापीठे ही शिक्षणाची भूमी-विद्यालये असतात. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी धार्मिक-राजकीय वाद निर्माण न करता अभ्यासावर, शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यालयात दर्जेदार शिक्षण देणे हीच शिवसेनेची भूमिका आहे.