मुंबई महानगरपालिकेने मंगळवार, 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढणार असल्याचे आज जाहीर केले आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी 11 वाजता ही आरक्षणाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. लॉटरी प्रक्रियेवर सूचना आणि हरकती 6 जूनपर्यंत मांडता येणार आहेत. त्यामुळे मुंबई मनपाचे बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजल्याचे दिसून येत आहे.
सर्वेच्च न्यायालयाने 4 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दोन आठवडय़ांत महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने वाढलेल्या नऊ प्रभागांवर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता 227 वॉर्डवरून 236 वॉर्ड निश्चित झाले आहेत. त्यामुळे वाढीव नऊ प्रभागांचे आरक्षणही यावेळी जाहीर करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यानुसार पालिका निवडणुकीच्या आरक्षणात अनुसूचित जाती (महिला, अनुसूचित जमाती महिला) व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. तसेच आरक्षण सोडतीनंतर मतदार यादी तयार होईल. यादीवरही मतदारांच्या हरकती व सूचना मागवल्या जातील. मतदार यादीत नाव नसणे, वय अथवा पत्ता बदली झाल्यास तो सुधारून घेणे या तक्रारींचे निरसन करण्याच्या प्रक्रियाही पार पडतील. त्यानंतर मतदार यादी प्रभागनिहाय व बूथनिहाय करणे अशी कामे होतील.