खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. यापूर्वी सुद्धा सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले होते. हिवाळी अधिवेशावेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिच्या दुखण्याच्या त्रासामुळे ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नसतानाही सत्तार यांनी यासंदर्भातील विधान केलं होतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.
“शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी २५ वर्षांपासून राज्यात पूजा झाली आहे. २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. सुप्रियाताईंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा नंबर २५ वर्षांनंतर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी “हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार?”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली.