राज्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा मोठया प्रमाणात तुटवडा असताना भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिल्ली हुन चार्टर्ड विमानाने रेमडेसिव्हर औषधाचा साठा आणला होता. यावरून काही समाजाची कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली होती. तसेच कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती. या बाबतची सत्यता तपासण्यासाठी शिर्डी विमानतळावरील 10 ते 15 एप्रिलपर्यंतचे सर्व विमानांचे CCTV फुटेज व रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देतानाच खंडपीठाने जिल्हाधिकारी खासदार सुजय विखे-पाटील यांचे संरक्षण करीत असल्याचे निरीक्षण नोंदवित पुढील सुनावणी 3 मे रोजी ठेवली आहे. आज संपूर्ण राज्यभरात कोरोनाच्या संसर्गात रेमडेसिव्हीरची प्रचंड टंचाई असताना नगरचे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी 10 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा शिर्डी विमानतळावर विशेष विमानांमधून उतरविल्याने आणि त्याचा व्हीडिओही प्रसारीत केल्याने ते अडचणी आले आहेत.
त्याच बरोबर रेमडेसिव्हीरची बेकायदेशपणे वाटप केल्या प्रकरणी विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी केली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेऊन विखे-पाटील यांच्या केलेल्या बचावाबद्दल ताशेरे ओढले आहेत. जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेऊन सदर इंजेक्शनने दिल्ली ते शिर्डी असा विमान प्रवास केलेला नाही असे म्हटले आहे. हा इंजेक्शनचा साठा पुणे येथून आणलेला असून त्यापैकी बहुतांश इंजेक्शन विखे पाटील मेडिकल स्टोअरकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत, असे ते म्हणतात. त्यामुळे दिल्लीतून विमानाने आणलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचे बॉक्स पुण्याहून आणलेल्या इंजेक्शनव्यतिरिक्त आहेत का? असा सवाल न्यायालयाने केला आहे.