राज्यात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता कोरोना रोखण्यासाठी जागोजागी लसीकरण शिबिरे भरवण्यास सुरवात केली आहे. मात्र आत या लसीकरणामुळे होणाऱ्या गर्दीमुळे एकच गोंधळ उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाण्यात आज लसीकरण कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गेटमधून आत शिरण्यासाठी लोकांनी गोंधळ घातला होता. खासदार राजन विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीपासून स्वत: राजन विचारे या कार्यक्रम स्थळी हजर होते. सुरुवातीला ३०० लोकांचं लसीकरण या कार्यक्रमातून होणार होतं.
या कार्यक्रमाला आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी आलेली संख्या पाहता आणखी २०० जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. लसीकरणासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आले होते.
मात्र लसी घेण्यसाठी जमलेल्या गर्दीमुळे गेटवर गोंधळ उडाला. गेट बंद करण्यात आले. ओळखीच्या लोकांना आत सोडलं जात असल्याचं आरोप लोकांनी केला. त्यावेळी गेटवरील प्रकार पाहून खासदार राजन विचारे संतापले. त्याठिकाणी उभे असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारून ओळखींच्या आत कशाला सोडता? सकाळपासून लोकांनी रांगा लावलेत असं बजावलं.