शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा भावना गवळी यांच्या अडचणीत अधिक वाढ होत असलेली दिसून येत आहे.
भावना गवळी यांना याआधीही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीला येऊ शकत नाही, असं ईडीला कळवलं होतं. मात्र आता चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी देखील भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भावना गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी ४४ कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, ११ कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले.
विशेष म्हणजे हा ५५ कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ २५ लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी ११ कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे भावना गवळींनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.