नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील ८ वर्षांतील आपल्या कार्यकाळात युवक, शेतकरी, सुरक्षा दलांतील जवान, छोटे व्यापारी, अनुसूचित जाती, जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक व अन्य सर्वांची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसने केला.
मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आठ वर्षे, आठ फसवणुकी, भाजप सरकार अपयशी, अशा शीर्षकाची एक पुस्तिका काँग्रेसने जारी केली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला व सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अच्छे दिन येतील, अशा घोषणा झाल्या; परंतु मोदी आले तर महागाईच आली.
आज देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाहीच; उलट त्यांचे दु:ख १०० पटींनी वाढले. मोदी मंदीचे दिवस घेऊन आले. आता अच्छे दिनांचा फ्लॉप चित्रपट उतरला आहे. तर, सूरजेवाला म्हणाले की, सरकार आपल्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता कपट व खाेटेपणाचा आश्रय घेत आहे.
काँग्रेसच्या पुस्तिकेत तपशील, आकडेवारीसह सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल, डिझेल व अनेक खाद्यवस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या भरमसाट वाढीचा उल्लेख त्यात आहे. भाजप आहे, तर महागाई आहे अशी टीका सुद्धा करण्यात आली आहे.