केंद्रातील मोदी सरकारच्या NBCC कंपनीने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची किंमत ठरवली आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारवर भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपाने त्वरीत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपला उघडे केले आहे. सत्ता हव्यासापोटी आघाडी सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या एनबीसीसीला काम दिले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रकल्प किंमत 900 कोटी कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
मोदी सरकारच्या NBCC कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी 28 फेब्रुवारी 2020 ला विधिमंडळाला दिलेल्या ई-टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत 810 कोटी सांगितली. नंतर 8 डिसेंबर 2020 रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात 875.62 कोटीं इतकी वाढवली. आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या NBCC ने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.