राज्यात भाजप आणि शिवसेना पक्ष राजकीय वैरामुळे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. दोन्ही पक्षांत टोकाचे राजकीय वाद असताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत राहणार असल्याचा इरादा बोलून दाखविला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल, असे अस वक्तव्य करून पक्षाला आव्हान दिले आहे.
पारनेर तालुक्यातील एका पदाधिकार्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी, सभापती गणेश शेळके, युवा नेते सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, अॅड. बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, शंकर नगरे, प्रियंका शिंदे, अश्विनी थोरात, योगेश रोकडे, दीपक पवार, सागर मैड आदींसह भाजप, सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे.