महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत ज्या विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत त्यांच्या अध्यक्षांच्या सदस्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत.
यावेळी बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर कर्नाटकातील हिजाब वादावरही प्रतिक्रिया दिली आहे.
नांदगावकर म्हणाले की, “आमच्या पक्षाची भूमिका हिंदुत्वाची असून आपल्या देशात अशा प्रकारच्या घटना घडणे चुकीचे आहे. बाळा नांदगावकर यांची काही वेगळी मते नसून मी राज ठाकरे साहेब यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका”, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान बाळा नांदगावकर यांना मनसे ‘किंग मेकरच्या’ भूमिकेत असणार का, असा प्रश्न विचारला असताना, म्हणाले, ‘किंग मेकर’ कशाला आम्ही तर ‘किंग’ बनणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला आम्हाला साथ द्यायची असेल ते देतील. तसेच या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कामे करायची आहेत याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप जे सुरू झाले आहेत त्यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, आरोप-प्रत्यारोप पूर्वी पासून होत आले आहेत आणि होत राहणार आहेत, मात्र लोकांच्या समस्या आहेत त्या तशाच आहेत, त्यामुळे आम्ही लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढे जाणार आहोत. असे बाळा नांदगावकर यांनि म्हटले आहे.