मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी आता काँग्रेस नेत्यांनी अयोध्या वारी करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अयोध्येसाठी दर्शन यात्रा काढणार आहेत. हा कुठलाही राजकीय दौरा नसून, केवळ प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जात असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माध्यमांना सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावावर भाजपसह काही-काही पक्ष राजकारण करीत असताना दशरथ गढीचे प्रमुख महंत यांनी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यांनी अयोध्येला दर्शनाचे निमंत्रण दिले.
पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, काँग्रेससाठी केवळ सन्मानाची बाब नसून हा प्रभू रामांचा आशीर्वाद आहे. इतर पक्षांचे नेते राजकारणासाठी अयोध्येचा दौरा करतात. आम्ही मात्र दर्शनाला व आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत. देशात खऱ्या अर्थाने रामराज्य यावे व देशाचे जे मानसिक विभाजन होत आहे, विकासाचा रथ गर्तेत रुतला आहे, तो बाहेर काढण्याची शक्ती देवो, अशी प्रभू रामांकडे प्रार्थना करणार आहेत, असेही लोंढे यांनी स्पष्ट केले.