नवी मुंबई | महाराट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार होते. मात्र आता मुंबई कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र कोर्टाने ७ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने गजानन काळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काळे यांच्या पत्नीला संपूर्ण मदत करत काळे यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच तृप्ती देसाई यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे गजानन काळे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.