आमदार दिलीप मोहिते हे तालुक्यात हुकूमशहा झाले आहेत, ते कोरियाचे हुकूमशहा किम जोंगसारखे काम करीत आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहिते हे हुकूमशाही, दडपशाही आणि शूद्र राजकारण करीत आहेत, अशा घणाघाती टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
जिल्हा परिषदेने खेड पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामाची प्रशाकीय मान्यता रद्द करण्याचा ठराव नुकताच केला आहे. यामुळे सेना आक्रमक झाली असून हा ठराव तात्काळ रद्द करावा. खेड पंचायत समिती इमारतीचे काम भूमिपूजन झालेल्या ठिकाणी व्हावे अन्यथा येत्या २६ मार्चला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा आढळराव पाटील यांनी दिला आहे,
खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीला २५ सप्टेंबर २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता सरकारने दिल्यानंतर त्यावर या इमारतीच्या जागेचे सध्याच्या पंचायत समितीसमोरील जिल्हा परिषदेच्या जागेत भूमिपूजन करण्यात आले होते. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांनी यासाठी पुढाकार घेत सुमारे ५ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकी स्व सुरेश गोरे यांना अपयश आले दिलीप मोहिते आमदार झाले.
त्यानंतर मात्र भूमिपूजन झालेल्या जागेत इमारत न बांधण्याचा निर्णय आमदार मोहिते यांनी घेतला. त्यांनी आहे त्या जागेवर इमारत बांधण्यासाठी आग्रह धरला त्यामुळे गेली दीड वर्षांपासून हे बांधकाम रखडले आहे. या काळात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मतभेद झाले. शिवसेना भूमिजन झालेल्या ठिकाणी इमारत बांधण्यावर ठाम आहे. यासाठी माजी आमदार स्व गोरे यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्न केले करोनाच्या काळात त्यांनी हे काम मार्गी लागावे यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीत असताना त्यांना करोनाची लागण झाली यात त्यांना जीव गमवावा लागला म्हणून त्यांची प्रेरणा आणि अस्मिता जपण्यासाठी ही इमारत पंचायत समितीपुढील जागेतच व्हावी यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत.