देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिम युद्ध पातळीवर राबवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. तसेच १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस घेण्याची मुभा केंद्राने दिलेली आहे. त्यामुळे लसीची मागणी मोठया प्रमाणात वाढल्यामुळे लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मागणी सुद्धा वाढली होती. मात्र कच्च्या माल पुरवणाऱ्या अमेरिकेने काही कारणे पुढे करत कच्चा माल पुरवण्याचे थांबवले होते.
मात्र अखेर अमेरिकेने एक पाऊल मागे घेत भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचे मान्य केले आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीच्या कमला युद्ध पातळीवर सुरवात होणार आहे.
काही दिवसांपूर्वी कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचे त्यांनी सांगितले होते. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.