मुंबई- भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अपमानकारक विधानाचे देशासह जगभरातील इस्लामी देशांत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे.
अमोल कोल्हे ट्विट करत म्हणाले की, आज, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्या देशाच्या पाठीशी प्रथमतः देशाचा एक नागरिक म्हणून आणि जनतेतून निवडून आलेला खासदार या नात्याने खंबीरपणे उभा आहे. आम्ही आमच्या देशाचे प्रश्न अंतर्गतरित्या सोडवू. काही क्षुल्लक लोकांच्या चुकांमुळे माझ्या देशावर होणारी टीका ही अत्यंत चुकीची आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.