मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटले आहे. आता या वादात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एंट्री केली आहे.
आशिष शेलार यांचे विधान आक्षेपार्ह असल्याचे म्हणत पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी शिवसेनेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे आता खुद्ध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाला स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारबद्दल स्वत:हुन तक्रार घेण्याचा अधिकार आहे. यानुसार, आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केले विधान हे अत्यंत अवमानकार आहे, त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. तसंच, या प्रकरणाबद्दल राज्य महिला आयोगाने नाराजी व्यक्त केली असून मुंबई पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही रूपाली चाकणकर यांनी दिली.