आगामी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. त्याबाबत नव्याने याचिका दाखल केली असून उद्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी म्हणून मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली होती.
आता याच याचिकेचा आधार घेत 20 जून रोजी होणाऱया विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची विनंती मलिक यांच्या वतीने आज ऍड. तारक सय्यद आणि ऍड. कुशल मोर यांनी न्यायालयाला केली. त्यावर आज न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने मलिक यांना याप्रकरणी नव्याने याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी उद्या मंगळवारी ठेवली आहे.
देशमुखांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी
मनी लॉण्डरिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही विधान परिषदेसाठी मतदान करण्याची मुभा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी 15 जून रोजी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.