दुधाचे अभिषेक कसले करून घेताय, हिंमत असेल तर कश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा! काय परिस्थिती आहे कश्मीरमध्ये, रोज पंडितांना गोळय़ा घातल्या जात आहेत. घरदार सोडून कश्मिरी पंडितांवर पुन्हा निर्वासित होण्याची वेळ आली आहे. कुणामुळे आली ही वेळ? मर्द असाल तर आधी कश्मिरी पंडितांचे रक्षण करा, अशा खणखणीत शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या बोगस हिंदुत्वाचा पर्दाफाश केला. काय बोलत आहेत भाजपचे प्रवक्ते, कुणीतरी यांच्या मेंदूत अक्कल घालायला पाहिजे.
भाजपच्या एका टीनपाट प्रवक्त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला. गुन्हा भाजपने केला आणि माफी देशाला मागावी लागली. कुणामुळे ओढवली ही परिस्थिती? भाजपची भूमिका ही देशाची भूमिका नाही. मोहनजी, हात जोडून सांगतोय… आपली कार्टी कशी वाहय़ात झाली आहेत हे अगोदर बघा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे मान्य आहे का हेही एकदा आम्हाला सांगा, असे खडे बोलही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची नाही. परंतु कार्टी वाहय़ात झाली आहेत, त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीवरून घेतलेल्या भूमिकेचे स्वागतच आहे, पण भाजपचे बेलगाम प्रवक्ते जे काही बोलत आहेत ते संघाला मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेनेवर मदतीचा संस्कार आहे. संकटाच्या काळात मदतीला धावून जातो तो फक्त शिवसैनिकच. शिवसेनेला उपटून फेकण्याची भाषा करणारांनी लक्षात ठेवावे, त्यांच्या पिढय़ा उपटल्या जातील पण शिवसेनेची वज्रमूठ भक्कम राहील. आम्ही रामभक्त आहोतच. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. गधा आम्ही केव्हाच सोडला आहे, असेही ते म्हणाले. हृदयात राम आणि हाताला काम हा आमचा मूलमंत्र आहे!