मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा गाजत असताना खासदार छत्रपती संभाजी राजेंनी रायगडावरून रविवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण तापलेले दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे म्हणून आघाडी सरकारने सुद्धा पाऊले उचलायला सुरवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटल आहे. मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबाबत आता संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधानांशी भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करणार आहे,’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
काय म्हणाले होते छत्रपती संभाजीराजे वाचा
16 जून ला शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करण्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. तसेच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.