शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे. आता कार्यकर्त्यांनी काहीसा आक्रमक पावित्रा घेतला आहे. पंढरपूर या ठिकाणच्या महावितरण कार्यालयात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जिवंत नाग भेट दिला आहे. तर सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अज्ञात संतप्त शेतकऱ्यांनी साप सोडला असून महावितरणचे कार्यालयही पेटवून दिले आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून शेतीसाठी दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन सुरु केले असून आज पंढरपूर मध्ये स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिवंत नाग भेट दिला. शेतीला रात्रीची वीज मिळत असल्याने पाणी द्यायला गेल्यावर साप, नाग अशा प्राण्यांमुळे शेतकऱ्याच्या जीवाला वारंवार धोका होत असतो.
तसेच दुसरीकडे वारेमाप विजेची बिले जगाच्या पोषणकर्त्याकडून वसूल करता आणि वीज मात्र रात्री देऊन त्याला मरायला सोडून देता, असा संतप्त सवाल स्वाभिमानीचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला. यावेळी शेतात सापडलेला भला मोठा जिवंत नाग त्यांनी बरणीत भरून अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आणला होता. यावेळी स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन अधिकाऱ्यांनी स्वीकारले मात्र जिवंत नागोबाच्या बरणीला काही अधिकाऱ्यांनी हात लावला नाही आज तुम्ही बरणीबंद सापाला हात लावायला भिता तर दुसरीकडे आम्हाला तुमच्यामुळे धोकादायक स्थितीत रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थिती केला होता.